Monday, April 13, 2020

नैराश्यतेचं सावट की आशेचा किरण ?


नक्की कुठल्या वर्गात असताना आठवत नाही पण शाळेत हे वाक्य वाचनात आलं होतं ते म्हणजे 'माणूस हा समाजशील प्राणी आहे'. जगभरात कोरोनाच्या थैमानामुळे भेडसावलेल्या  परिस्थितीत माणसाचं हे समाजशील असणंच त्याच्या जीवावर उठलंय. कोरोनाच्या वाढत्या गुणाकारामुळे सगळ्यांनाच घरी बसण्याची वेळ आली आहे. स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी तसं करणं गरजेचं आहे यावर कुणाचंच दुमत नाही पण त्यापलीकडे जाऊन 'घरी बसणं किंवा घरी राहणं' या स्थितीकडे आपण कसं पाहतो हे जाणून घेणंही गरजेचं आहे. कारण घरी राहण्यामुळे जगभरात आर्थिक अवस्था बिकट झाली असली तरी त्याचे मानवी जीवनावर कसे आणि किती परिणाम होतात हेही समजून घ्यायला हवेत. 

साधारणपणे ८०-९०च्या दशकात एकत्र कुटुंब पद्धती असलेल्या धाटणीचे चित्रपट मोठ्या प्रमाणात बनवले जात असंत. अर्थात त्याला मागणी असल्याने ते चालायचेही तितकेच सुपरहिट आणि विशेष म्हणजे हे चित्रपट पाहायला अनेक जण (अर्थात ज्यांना परवडेल अशी मंडळी) आपला कुटुंब कबिला घेऊन जायचे.  घरातून कुठे बाहेर फिरायला जाणं आलं की सगळ्यांनी सोबत जायचं असंच प्लॅनिंग हमखास असायचं. सध्या मात्र तशी परिस्थिती नाही, लोकं अनेक कारणासाठी घराबाहेर पडलीयेत ज्यामुळे त्यांना त्यांच्या मुळ  कुटुंबापासून वेगळं राहावं लागतं आणि मग पुढे 'हम दो  हमारे दो; या संकल्पनेत लोकं रमत गेलीत. साधारण ९०च्या पुढच्या दशकात ही परिस्थिती निर्माण झाली.

मात्र आता विसाव्या शतकात समाजशील मानला जाणारा माणूस फार फारतर तो आणि त्याची बायको (असली तर) आणि एखादं मुलबाळ एवढंच समीकरण वाढू लागलंय. अर्थात हे समीकरण सगळीकडे सारखं आहे असं नाही. शहरातल्या उच्चभ्रू ठिकाणी असं चित्र पाहायला मिळतं. मात्र शहरात मोठ्या संख्येने असणाऱ्या झोपडपट्ट्या, छोट्या चाळी, सोसायटी अशा अनेक ठिकाणी संभ्रमात असलेल्या या 'समाजशील' माणसाच्या कुटुंबात 'कमीतकमी' पाच माणसं आहेत. त्यानं कसा तग धरावा हा प्रश्न आहे?

जो कामानिमित्त बाहेर असला की ज्याला किमान बरं वाटतं कारण घरच्या कटकटींपेक्षा काम बरं असं त्याला  वाटतं. ही अवस्था फक्त पुरुष माणसाची आहे असं नाही तर बाई माणसांचेही तसंच आहे. सकाळी लवकर उठून स्वयंपाक उरकून ठरलेली लोकल आणि लेडीज डब्याची जागा पटकावणाऱ्या महिलांची पण हीच गाथा आहे.  एकूणच काय तर शहरात राहणारा  माणूस स्वतःसाठी किंवा इतरांचा त्रास होऊ नये या ना त्या कारणाने घराबाहेर राहणं पसंत करणारा आहे. त्यामुळे शहरातल्या या 'समाजशील' माणसाला' सध्या लॉकडाऊनमध्ये इतके दिवस घरी बसण्याचा कंटाळा आलाय. १० बाय १० च्या खोलीत... त्यातून ऐन उन्हाळ्यात 'हम साथ साथ है' कितीवेळा फील करायचं यालाही मर्यादा आहेत. 

त्यातून आजवर कधीच न मिळालेल्या एवढ्या मोकळ्या वेळेत काय करता येईल याचं प्लॅनिंग शून्य. म्हातारपणात वेळ घालवता यावा म्हणून नातवंडांशी खेळत बसू हा आणि एवढाच फ्री टाइम मॅनेजमेंट आपल्याकडे प्रचलित आहे. अगदी आपल्या तरुण मंडळींनाही या मोकळ्या वेळेचं करायचं काय हा प्रश्न आहे. व्हॉट्सअॅप , फेसबुक, टिकटॉक युनिव्हर्सिटीतली मंडळीही कंटाळून गेली आहेत. घरातल्या स्त्रीला मात्र यात सुट्टी नाही. दोन वेळेचा नाश्ता आणि जेवण, त्याचा पसारा उरकता उरकता तिचा वेळ बराचसा संपून जातो. त्यामुळे तिला कितपत मोकळा वेळ मिळत असावा याबद्दल थोडी शंका वाटते. त्यातल्या त्यात बच्चे कंपनीची हक्काची उन्हाळी सुट्टी वाढवून मिळाल्याने ते घरातले खेळ खेळतात पण घरात तरी किती थांबणार यालाही कंटाळ्याची सावली आहेच. 

तर सांगायचं  एवढंच की आपण 'या मोकळ्या वेळेचा करायचं काय'हा प्रश्न कसा सोडवता येईल यावर कोरोनाच्या निम्मिताने का होईना विचार करणं महत्त्वाचं झालंय. मोकळ्या वेळेत बाहेर फिरायला जाणाऱ्या आपण सर्वांनी, घरी मिळालेल्या मोकळ्या वेळेत काय करू शकतो यासाठी जरा डोकं खाजवायला हवं.  आपली वाचायची राहून गेलेली पुस्तक, आपले छंद, नवीन गोष्टी शिकण्याची धडपड असं सगळंच पुन्हा धूळ खात पडलेल्या मनातून बाहेर काढायला हवं. रोजच्या धकाधकीत 'वेळच मिळत नाही' अशी कारणं देणारे आपण जरा एवढ्या मोकळ्या वेळेतून काहीतरी नवीन, वेगळं आणि स्वतःचं असं नक्कीच घडवू शकतो. कारण तेवढी क्षमता आपल्या या 'समाजशील' माणसात नक्कीच आहे. माणूस तर धकाधकीच्या जीवनात धावतोच आहे, पण कदाचित आपण आपल्या सोबत निसर्गालाही धावायला लावत असू. त्यामुळे जणू  निसर्गाकडूनच हा ब्रेक मिळाला असावा की जेणेकरून गोष्टींकडे, नात्यांकडे, समाजाकडे, निसर्गाकडे आणि अर्थात स्वतःकडे नव्याने पाहण्याची मोठी संधी माणसाला मिळाली आहे. 

माणसानं समाजशील असणं ही समाजाची आणि त्याची गरज आहे पण त्यानं त्याचबरोबर आत्मपरीक्षण करणारंही असावं ही येणाऱ्या काळाची गरज आहे. स्वतःच्या वेळेचा, नात्यांबद्दल, भांडवल व्यवस्थेत आपलं काय योगदान आहे, दिवसभरातला कुठला वेळ आपण कशासाठी आणि किती वेळ घालवतो. त्याचं  जास्तीत जास्त ऑप्टिमायझेशन कसं करता येईल जेणेकरून आपल्याला मोकळा वेळ कसा मिळेल हे बघता येईल याचा विचार या निमित्तानं आपण करायला हवा. लॉकडाऊन संपल्यानंतरही किमान थोडावेळ का होईना पण 'मोकळा वेळ' मिळणं आवश्यक आहे. माणसाच्या बौद्धिक जडणघडणीचा तो अविभाज्य भाग असल्याचं मनोवैज्ञानिक सांगतात. समाजशास्त्रज्ञ अरविंग गॉफमनच्या म्हणण्यानुसार दररोजच्या आयुष्यातला बराचसा वेळ आपण दुसऱ्यावर प्रभाव पाडण्याच्या व्यवस्थापनातंच घालवतो. उद्योग समूहाने आखून दिलेल्या जीवनशैलीमध्ये 'समाजशील' माणूस एकलकोंडा झालाय. माणसांना मिळणारा मोकळा वेळ काढून टाकला पाहिजे अशी धारणा या उद्योग समूहाची असल्याचं समाजशास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. कारण माणसांना मोकळा वेळ मिळाला तर ते 'त्यांना' हवं ते करतील, 'त्यांच्या' मनाप्रमाणे वागतील ज्यामुळे सामाजिक व्यवस्थेची घडी विस्कटू शकते म्हणून माणसांना 'बिझी ठेवणं, त्यांना गुंतवून ठेवणं' गरजेचं आहे असा भांडवलशाही व्यवस्थेचा अजेंडा असल्याचंही अनेक समाजशास्त्रज्ञ सांगतात. कोविड -१९च्या  निमित्तानं का होईना आपल्याला मिळालेल्या या 'मोकळ्या वेळे'च्या संधीत येणाऱ्या पुढच्या काळात आपली तत्त्व, विचार, वागणूक याची सांगड कशी घालता येईल याचा विचार करणं महत्त्वाचं आहे. 




2 comments: