कोविडच्या काळात सगळीकडे
‘हेल्थ, आयुष्य, हायजिन’ हे सर्व शब्द अचानक महत्त्वाचे वाटू लागलं होतं. पण हे
सगळं सिच्युएशनल आहे काही तरी शाश्वत असा विचार हवा असं त्यावेळी वाटू लागलं. हे
शाश्वत शोधत असताना आपली माणूस म्हणून चाललेली प्रगती ही क्षणिक आणि तकलादू आहे
याची प्रचिती येऊ लागली. आपण शोधत असलेल्या तात्कालिक गोष्टींमधल्या सुखांमध्ये निसर्गासारख्या
महान शिक्षकाचा अभाव आहे अशी जाणीव होऊ लागली. याच बेचैनी आणि जाणिवेतून जगण्याचा,
माणूसपणाचा वेगळा मार्ग शोधू लागलो. धकाधकीच्या आयुष्यातून बाहेर जाऊन स्वतःचं
वेगळं, पण निसर्गाशी आणि माशूसपणाशी जोडलेलं विश्व निर्माण केलेली कोणी मंडळी आहेत
का असा शोध सुरु झाला. या दरम्यान दिलीप कुलकर्णींचा आयपीएच आवाहनमार्फत घेतलेला
एक यूट्यूब व्हिडीओ पाहण्यात आला. त्यानंतर त्यांची ‘स्वप्नामधील
गावा...,हसरे पर्यावरण, निसर्गायण’ ही पुस्तकं आम्ही वाचून काढलीत. आपण जे बोलतोय त्याला दिशा मिळाली. दिलीप
कुलकर्णींना भेटण्याचा मोहपण निर्माण झाला पण त्यांच्या स्वप्नामधील गावा... या पुस्तकातल्या
शेवटच्या पृष्ठभागावर दिलेल्या नियमांनुसार ‘किमान’ निसर्गस्नेही जगणा-यांनी भेटण्यास यावे अशी अट दिल्यानं आम्ही मग जमेल तसं थोडं थोडं का होईना बदल करायला सुरुवात केली.
ठाण्यातले जयंत
जोशी यांच्या मार्गदर्शनाने किचन वेस्ट घरच्याघरी कंपोस्ट करण्याचं काम सुरु केलं.
दुधाची पिशवी आणण्यापेक्षा किटलीमध्ये ते आणणं सुरु केलं. लांबचा आणि जवळचा प्रवास
जास्तीत जास्त पब्लिक ट्रान्सपोर्टने करायचं ठरवलं. अर्थात जीवनशैलीतले हे छोटे
छोटे बदल करणं जरा सवयीचं व्हायला वेळ लागतोय पण त्याचबरोबर हीसुद्धा भावना आहे की
हे एवढं पुरेसं नाहीए. म्हणून ख-या अर्थानं ‘लाईफ’ जगणा-या नव्या माणसांशी ओळख आणि त्यांचं
जगणं काही अंशी जवळून पाहण्याचा आमचा प्रवास सुरु झाला. या
प्रवासाचा श्रीगणेशा कुडावळ्यातील दिलीप आणि पुर्णिमा कुलकर्णी यांना भेटून सुरु झाला. पुढे तिथलेच विनायक महाजन आणि
त्यांची पत्नी, विक्रांत पाटील, बॅंगलोरमधील वसंत आणि ललिता जाजू, मुरली आणि मीरा, तामिळनाडूमधील
गोपी, मुरली आणि इतर मंडळी, तसंच धामापूरमधले
सचिन आणि मीनल देसाई ही सर्व दिशादर्शक मंडळी आमच्या आयुष्यात आली. आपली जीवनशैली जास्तीत जास्त साधी पर्यावरणपूरक पण तरीही जगणं समृद्ध
करणारी असू शकते या विचारावर जगणारी ही सर्व मंडळी. या सगळ्याकडून मिळालेल्या बाळकडूचं वर्षभर मंथन झाल्यावर
ठरवलं पुढच्या येणा-या काळात आपली जीवनशैली आणखी साधी कशी करता येईल यावर भर
द्यायचा. अर्थात हे सोपं नाही कारण लहानपणापासून शहरात वाढलेलो आम्ही पण तरीही
प्रयोग म्हणून एक महिना कोकणात गावाला जाऊन राहायचं ठरवलं. जिथे दोघांपैकी कुणाचे
नातेवाईक नसतील आणि निसर्ग मनमुराद भेटेल हे दोनच नियम लागू केले. बाकी सर्व येईल
तसं ते अनुभवायचं असं ठरवलं.
या एका महिन्यात अनेक
छोट्या अडचणीपण आल्या पण त्या दोघांनी मिळून निभावून नेल्या. आम्ही जिथे राहत होतो
ते मार्केटपासून १० मिनिटं असल्यानं ताज्या भाज्या दोन दिवसांनी आणणं, अर्थात फ्रिज
नसल्यानं त्याप्रमाणे बदल करणं गरजेचं होतं. दिवसभरातली रोजची कामं मॅन्यूअली करावी
लागत होती पण यामुळे कुणा एकावर कामाचा भर पडू नये म्हणून कामाची विभागणी करून
दोघांनी ती करणं हे आपसूकचं होत गेलं. कारण दररोजच्या कामांखेरीज पीएचडीचा अभ्यास
हेसुद्धा उद्दिष्ट होतं. ताजा आहार, रोज किमान तासभर चालणं, अध्यात्मिक वाचन आणि चर्चा,
ज्यांच्या घरी राहिलो त्यांच्यासोबत निसर्ग समजून घेण्यासंदर्भात गप्पा असा
दिनक्रम चालू होता. दरम्यान जवळच्या गावांमध्येही अनेक ठिकाणी फिरुन आलो. या
महिन्याभराच्या प्रवासात एखादी गोष्ट आपल्याकडे नाही याचा बाऊ करण्यापेशा तिच्याऐवजी
काय पर्याय निवडता येईल अशाही गोष्टी केल्या ज्यामुळे नवीन निर्मितीचा आनंद
अनुभवता आला. पण आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही गोष्टींना पारंपारिक पर्याय
असले तरी त्यांची सवय होण्यासाठी कालावधी देणं गरजेचं आहे आणि काही गोष्टी नव्या
तंत्रज्ञानानुसार वापरणंही गरजेचं आहे. हा प्रवास फार मोठा आहे, जो अर्थात एक
महिन्याच्या प्रयोगामुळे फक्त लिटमस चाचणीचे रिझल्टस दाखवणारा आहे. पण तरीही ती लिटमस
चाचणी पास झाल्यानं भविष्यात स्वीकारलेल्या मार्गावरुन चालण्याचा विश्वास निर्माण
झालाय. हा प्रयोग बरंच शिकवणारा, माणूस म्हणून आणखी समृद्ध करणारा आणि ज्या दिशेने
पुढे जायचे आहे त्याला आणखी मार्ग मिळवून देणारा होता. पुढच्या वाटचालीत नवे
प्रयोग करुन पाहायचेत त्यातले यशअपयश भविष्यात पाहूत.
स्वप्नामधील गावा... https://www.bookganga.com/eBooks/Books/Details/5503507397656335779
हसरे पर्यावरण https://www.bookganga.com/eBooks/Books/Details/5323263903075482267
निसर्गायण https://www.bookganga.com/eBooks/Books/Details/5381039699231365389
सचिन देसाई https://syamantak.cfsites.org/custom.php?pageid=28434
खूप अप्रतिम लिखाण. ह्या लिटमस चाचणी नुसार लवकरच हा अनुभव पुन्हा घेतला जाणार वाटत.
ReplyDelete